ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 20 - उत्तराखंड राज्यात बद्रीनाथ मार्गावर विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे तेथे अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये जिल्ह्यातील एकाही यात्रेकरूचा समावेश नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी दिली. वैयक्तिकरीत्या यात्रेसाठी गेलेल्यांपैकी कोणी अडकले असल्यास नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. सदर घटनेबाबत आपण स्थानिक यात्रा कंपन्यांशी संपर्क करून माहिती घेतली. मात्र जिल्ह्यातील कोणीही यात्रेकरू या कंपन्यांमार्फत उत्तराखंड येथे यात्रेला गेलेले नाही. चौधरी यात्रा कंपनीचे 100 यात्रेकरू विष्णूप्रयाग येथे अडकल्याची माहिती मिळाली. त्यात धुळे जिल्ह्यातील कोणाही यात्रेकरूचा समावेश नाही. जे यात्रेकरू आहेत, ते सटाणा, नाशिक येथील आहेत, अशी माहिती मिळाल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातून नागरिक वैयक्तिक रेल्वे अथवा बसने बद्रीनाथ यात्रेला गेलेले असतील आणि अशा परिस्थितीत त्यांच्याशी संपर्क होत नसेल तर त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी, आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
उत्तराखंड यात्रेकरुंच्या माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधा
By admin | Updated: May 20, 2017 16:23 IST