गुरुवारी सकाळी ९ वाजता ग्रामसभेला हजारो लोकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली अध्यक्षस्थानी सरपंच सोनीबाई गंगाराम भिल, होत्या. यावेळी उपसरपंच प्रा. अंकिता पाटील, सर्व सदस्य त्याचबरोबर
सचिव तथा ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
ग्रामसेवक प्रवीण ठाकरे विषयांचे वाचन करीत असताना ग्रामसभेत सर्वप्रथम ग्रामस्थांकडून अतिक्रमणाचा विषय निघाला. जलशुद्धीकरण केंद्राजवळ गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व सुसज्ज व्यायामशाळा १० लाख रुपये निधी खर्च करून बांधण्यात येणार आहे त्यासाठी येथील ९ हजार स्क्वेअर फूट अतिक्रमित झालेली जागा व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ग्रामसभेत देण्यात आली. यानंतर गावातील सर्व अतिक्रमण ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावे. ज्या व्यावसायिकाकडे ग्रामपंचायतीने जेवढी लिखित जागा दिलेली आहे त्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व अतिक्रमित जागा ग्रामपंचायतने जमा करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत मालकीचा बोर्ड लावण्यात यावा अशी सूचना ठेकेदार महेंद्र रामचंद्र पाटील यांनी केली. यानंतर महेश रोहिदास पाटील म्हणाले की गावातील काही ग्रामस्थांना अल्पशा भाडेतत्त्वावर ग्रामपंचायत मालकीच्या जागा व इमारती दिलेल्या आहेत ती सर्व मालमत्ता ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावी.
इथून ग्रामसभेला वाद उफाळला-
कापडणे गावातील आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेने शहीद स्मारक उभारण्यासाठी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला १०० बाय १०० स्क्वेअर फुटाची जागा केल्याने ग्रामस्थांमध्ये गदारोळ सुरू झाला. शहीद स्मारकासाठी जागा देण्याचे ग्रामसभेने मान्यही केले मात्र जागेच्या विषयावरून चांगलाच गोंधळ झाला.
कापडणे गावात २००८ मध्ये ३ कोटी ११ लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामास प्रारंभ झाला. बांधकाम अनेक वर्षांपासून पूर्णत्वास आले. मात्र काम निकृष्ट असल्याने आजही ती योजना ग्रामपंचायतने ताब्यात घेतलेली नाही. गावाला आजही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून आमदार कुणाल पाटील व गटनेते भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी गडीवर १६ लाख रुपये खर्च करून पाणी फिल्टर प्लांट उभारला आहे. मात्र तोदेखील ग्रामपंचायतने अद्याप सुरू केलेला नाही. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील यांनी दूषित पाण्याचा कॅन भरून ग्रामपंचायत प्रशासनाला दाखवत होते.
ग्रामसभेच्या अजेंड्यावर तब्बल ५०-५५ विषय होते. मात्र गदारोळ वाढल्याने, केवळ दोन-तीन विषयांवरच चर्चा झाली. तब्बल दोन-अडीच तास ग्रामसभा होऊनही ग्रामस्थांच्या गटात आरोप-प्रत्यारोप, सुरू होते. गोंधळ वाढत असल्याचे बघून ग्रामसभा तहकूब करून सरपंचासह इतर सदस्यांनी काढता पाय घेतला.
गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनगीर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. कोणीच ऐकून घेत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.