यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे आदींनी स्वागत केले.
जलज शर्मा हे चंदिगड येथील असून त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केले आहे.
मावळते जिल्हाधिकारी यादव म्हणाले, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झालेला होता. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सर्व विभाग, सर्व लोकप्रतिनिधी आणि माध्यमांच्या सहकार्यामुळे धुळे जिल्ह्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे. तसेच संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्व तयारी करण्यात आली आहे. याशिवाय सातबारा संगणकीकरण, मतदार ओळख छायाचित्र, कर वसुली आदींमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी बजावता आली आहे. धुळे जिल्ह्याबद्दल कुठे काय चर्चा हाेते. यापेक्षा हा जिल्हा साध्या, भाेळ्या लाेकांचा जिल्हा आहे. त्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात काम करतांना महसूलसह सर्वच विभाग, राजकीय पदाधिकारी, पालकमंत्री, प्रसारमाध्यमांनी दिलेली साथ प्रेरणादायी आहे. तसेच हा जिल्हा भावबंध जपणारा जिल्हा आहे. काेराेनामुळे अनेक विकासाची कामे राहून गेली. मात्र, वेगळ्या स्वरूपाची संधी मिळाल्यास निश्चित जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. विकास कामांमध्ये सातत्य ठेवत शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले. उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार सुचिता चव्हाण, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी मनोगत व्यक्त करीत नवीन जिल्हाधिकाऱ्यांची स्वागत केले. तर मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत निरोप दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भिमराज दराडे यांचीही बदली
प्रांताधिकारी भिमराज दराडे यांचीदेखील बदली झाली आहे. अजूनपर्यंत त्यांना पोस्टींग मिळालेली नाही. त्यांच्या जागी आयएएस तृप्ती धोडमिसे यांनी पदभार स्वीकारला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या धोडमिसे यांनी आयएएसपर्यंतची मजल मारली असून त्यांच्याकडे धुळे येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून चार्ज आहे.