न्यायालयीन निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे १५ गट व पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या ३० गणांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान, तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, सुरेखा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यादव म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावयाची आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोना विषाणूविषयक सर्व नियमांचे पालन करीत निवडणूक पार पाडावयाची आहे. मास्क वापरण्यास आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास मतदारांना प्रवृत्त करावे. या निवडणुकीसाठी भरारी पथके, बैठी पथके, व्हिडिओ पथके, तपासणी नाक्यांवर पथकांची नियुक्ती करावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची पाहणी करावी. तेथे वीज, पाणी, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असतील याची खात्री करून घ्यावी. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रांवर उपाययोजना कराव्यात. याशिवाय अधिकाधिक मतदान केंद्रे आदर्श होतील याची खबरदारी बाळगावी. संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन पोलीस दलाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी. उमेदवारांसह मतदारांच्या सुविधेसाठी तक्रार निवारण कक्ष, मदत कक्ष, नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन सुरू करावी. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे आणि मतदान होणाऱ्या भागात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम अभियानस्तरावर राबवावी. या निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून जनजागृती मोहीम राबवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक बच्छाव यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती झाली असल्याची माहिती दिली.