मनपात मंगळवारी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली. या वेळी आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते. शहरातील १ हजार ५०० सागाचे वृक्ष तोडण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज आला आहे. प्रशासनाने वृक्षतोडीची परवागनी देण्यासाठी प्रती वृक्ष ३०० रुपये शुल्क निश्चित केले आहे. ते भरण्यास वृक्ष मालकाने नकार दिला असून एका वृक्षासाठी १० रुपये शुल्क देण्याची तयारी दर्शवली आहे. याविषयावर सभेत चर्चा झाली. हर्षकुमार रेलन यांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त अजिज शेख म्हणाले की, दहा रुपये खूप कमी असून सदस्यांनी योग्य ती रक्कम निश्चित करावी व शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे सांगितले. चर्चेनंतर प्रती वृक्ष ५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. नगरसेवक अमोल मासुळे म्हणाले की, शहरात वृक्षारोपण मोहिमेतंर्गत अनेक ठिकाणी वृक्ष लावण्यात आले. त्यातील किती वृक्ष जगले याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उपायुक्त शांताराम गोसावी यांनी शहरातील वृक्ष गणना करण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.
शहरात वृक्ष गणनेसाठी होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST