वैधकीय महाविद्यालयातही रुग्ण वाढले, नियमांकडे दुर्लक्ष
धुळे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवले जात आहेत. जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण, नातेवाईक व काही कर्मचाऱ्यांकडूनच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न पडला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. जिल्ह्यात केवळ तीन सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र डेंग्यू, मलेरिया व इतर रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका बघता कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
ओपीडी हाऊसफुल्ल
- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र इतर रुग्णांची संख्या वाढली आहे.
- जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
- धुळे शहरात तसेच ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच मलेरियाच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील गर्दी वाढली आहे. खासगी रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत.
रुग्णालये सुपर स्प्रेडर ठरू नयेत
कोरोनाबाधित रुग्ण घटल्याने शासकीय रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू झाले आहेत. तसेच इतर संसर्गजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी वाढली आहे. नियम पाळले नाहीत तर रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरतील.
नियम पाळावेत
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू झाले आहेत. तसेच इतर संसर्गजन्य आजार वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे रखडलेल्या शस्त्रक्रियाही करण्यात येत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत वेळोवेळी सूचना देत आहोत.
- डॉ. दीपक शेजवळ. नोडल अधिकारी
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
शासकीय रुग्णालयात सध्या रुग्ण व नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. रुग्ण व नातेवाइकांना नियम पाळण्याबाबत सूचना देत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. पण सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसतो आहे.
मास्क हनुवटीलाच
शासकीय रुग्णालयात येणारे बहुतेक नागरिक मास्कचा वापर करताना दिसून आले. पण मास्क चेहऱ्यावर नव्हे तर हनुवटीवर लावत असल्याचे आढळले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.