धुळे : येथील महानगरपालिका प्रशासनाने मागासवर्गीय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या द्वेषभावनेने बदल्या केल्या असून, बदलीचे आदेश त्वरित रद्द केले नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने दिला आहे.
याबाबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.एम. आखाडे आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांना नुकतेच निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मनपातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार, मनपा उपायुक्तांच्या दालनात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक बोलावली होती. बेकायदेशीर पदोन्नती, नियुक्ती, पदस्थापना याबाबतचे पुरावे संघटनेने बैठकीत सादर केले, तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सेवा अखंडित धरून १२ व २४ वर्षे कालबद्ध, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी केली, परंतु सदर शासन निर्णय वित्त विभागाचा असल्याने तो मनपा कर्मचाऱ्यांना लागू होत नसल्याचे उपायुक्त शिल्पा नाईक यांनी स्पष्ट केले. याबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याचा राग येऊन आयुक्त आणि उपायुक्तांनी सूडबुद्धीने व द्वेषभावनेने संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. या बदल्या त्वरित रद्द करून बदल्यांचे आदेश मागे घ्यावेत, संघटनेच्या मागण्यांवर मुद्देनिहाय चाैकशी करून कार्यवाही करावी. तसे न केल्यास मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांचे पुरावे प्रसारमाध्यमांना देऊन शासनाकडेही तक्रार केली जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे, तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या विरुद्ध दडपशाहीचा प्रकार मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने दिला आहे.