लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भविष्य पाहून जीवनाची दिशा ठरविणे व्यर्थ आहे़ त्यापेक्षा सत्कर्माने आपले भविष्य घडविले तर जीवन सुकर होईल, असे बहुमोल ज्ञान शिवानीदीदी यांनी धुळ्यात दिले़येथील जिल्हा क्रीडश संकुलाच्या प्रशस्त मैदानावर प्रजापिता बह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘कर्मो की गहन गती’ या विषयावर शुक्रवारी प्रवचन झाले़ त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता़यावेळी धुळे केंद्राच्या समन्वयक रिटादीदी यांनी प्रास्ताविक केले़ उद्घाटन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले़ पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उप अधीक्षक सचिन हिरे, माजी महापौर कल्पना महाले, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव, अभियंता कैलास शिंदे उपस्थित होते़शिवानीदीदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परमेश्वर नशिब लिहीतो असे बालपणापासून सांगितले जाते़ प्रत्यक्षात आपले जीवन संस्कार आणि कर्मावर अवलंबून आहे़ चांगली कर्मे केली, दुसऱ्याच्या जीवनातील अंधार घालवला तर तेच आपले नशिब म्हणून पुढे कामी येते़ सध्या संस्कार आणि कर्म योग्य नाहीत़ त्यामुळेच धर्माच्या नावाने युध्द होतात़ महिला व मुली घरातही सुरक्षित नाहीत़ चांगले संस्कार आचरणात आणा़ त्यातूनच सुखी जीवनाचा मार्ग मिळेल़ हाताच्या रेषा पाहून भविष्यावर अवलंबून राहू नका़ सत्कर्माच्या बळावर स्वत:चे भविष्य स्वत: घडवा, असे मोलाचे मार्गदर्शन शिवानी दीदी यांनी उपस्थित जनसमुदायाला केले़प्रवचन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कर्माने भविष्य घडवा : शिवानीदीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:32 IST