शहरातील मध्यवर्ती मुख्य बाजारपेठ असलेल्या कराचीवाला खुंट ते प्रभाकर चित्रपटगृहापर्यंत होणाऱ्या उड्डाण पुलासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आग्रारोडवर शहराची मुख्य बाजारपेठ आहे. या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत. आग्रा रस्ता शहराचे हृदय आहे. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल उभारला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. या रस्त्यावरून गणेशोत्सव, बालाजी रथोत्सव, शिव जयंतीला मिरवणूक काढण्यात येते. तसेच विविध पक्षांचे मोर्चे, रॅली या रस्त्यावरून निघतात. या रस्त्यावर उड्डाणपूल झाला तर या सण, उत्सवाच्या परंपरा मोडीत निघतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक उलाढालीवर परिणाम होईल. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल करू नये. त्याऐवजी टाॅवर उद्यान ते श्रीराम पेट्रोलपंप, ऐंशी फुटी रोडवरील नटराज चित्रपटगृह ते लोकमान्य हॉस्पिटल, विटाभट्टी नाला ते अजमेरा महाविद्यालयापर्यंत उड्डाणपूल करावा. तसेच या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. तसेच आग्रा रोडवरील फेरीवाल्यांना कायमची जागा देऊन या रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी युवा सेनेचे पंकज गोरे यांनी केली.
उड्डाणपूल वर्दळीच्या रस्त्यावर उभारा : युवासेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST