धुळे : न्यायालयात माझा परिचय असून, तुला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवित ३१ वर्षीय तरूणाची साडेतीन लाखात फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाविरूद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.महागणपती हॉस्पिटल, टिटवाळा, ठाणे येथे राहणारा रुपेशकुमार हिरालाल सूर्यवंशी आणि भदाणे कुटुंबियांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा रुपेशकुमार याने घेतला. त्यासाठी सागर महाविर भदाणे याच्या आई-वडीलांचा विश्वास देखील संपादन केला. कोटार्ची खूप मोठी भरती निघणार आहे. त्यात मी सागरचे काम मुंबई येथे कोर्टात करुन देईन. केवळ जागा निघू द्या असे गोड बोलून विश्वास संपादन केला. माज्या खूप ओळखी आहेत, लघुवाद न्यायालय मुंबई येथील वरिष्ठांशी माझे जवळचे संबंध आहेत. त्यांना सांगून मी सागरचे काम करुन देईल अशी बतावणी करीत ३ लाख ५० हजार रुपये लागतील. आपण पैशांची तयारी ठेवा असे आश्वासन देत भदाणे कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. मार्च २०१८ मध्ये राज्यस्तर न्यायालयीन लिपीक लघुलेख व शिपाई/हमाल या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास सांगितले. या पदावर काम करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये लागतील असे खोटे आश्वासन देवून दिशाभूल केली. पैसे घेतले पण नोकरीचे काम काही केले नाही.ही घटना २६ मार्च २०१८ पासून आजपावेतो घडली. नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत मागितले. पण, पैसेही परत मिळत नसल्याने आपली फसगत झाल्याचे तरुणाचे लक्षात आले. याप्रकरणी सागर महाविर भदाणे (३१, रा. श्रीहरी कॉलनी, साक्री रोड, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील करीत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेतीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 21:57 IST