धुळे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिने निलंबित करण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत.
त्यामुळे केवळ दंड भरून सुटका करून घेण्याचा पर्याय जवळपास नाहीच आहे. पोलिसांच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी आता नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवू लागले आहेत. आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक प्रस्ताव पाठविले आहेत.
हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन
शासनाच्या निर्देशांप्रमाणे वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम कठोर केले आहेत. थेट परवाना निलंबनाचे प्रस्ताव पाठविले जात आहेत.
n दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग यासह इतर नियम तोडल्यास वाहनचालकावर परवाना निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते.
आधी तीन महिने नंतर कायमस्वरूपी
वाहतुकीचे नियम तोडल्यास कमीतकमी एका महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित होऊ शकते. वेळोवेळी नियमांचे उल्लंघन झाल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद नियमात आहे.
अशी होते कारवाई...
पोलिसांच्या वाहतूक शाखेने केस दाखल केल्यानंतर लायसन्स निलंबनाचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यावर संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेतो. प्रसंगी समजही दिली जाते; परंतु दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन केल्यास न्यायालयात खटला भरण्याची शिफारस केली जाते.
वाहतूक नियमांचे पालन करा
अपघातांचे प्रमाण टाळायचे असेल आणि वाहतुकीला शिस्त लावायची असेल तर वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी नियमांची जनजागृती केली जाते. वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. - धीरज महाजन, पोलीस निरीक्षक