आबा सोनवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री तालुक्यातील हजार ते पंधराशे लोकवस्तीचे जामदे हे गाव आतापर्यंत कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सोशल मीडियावर एका दाम्पत्याच्या टिकटॉक व्हिडिओमुळे अचानक चर्चेत आले आणि जमदे गावाचे नाव देशभर पोहोचले. बॉलिवूडची अभिनेत्री रविना टंडनने व्हिडिओला पसंती दिल्यानंतर अनेक चॅनलवाल्यांनी त्यांची स्टोरी बनवली आणि रातोरात हे जोडपे हिट झाले. काय विशेष आहे या गावात हे जाणून घेतले तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.साक्री तालुक्यातील जामदे गावातच फक्त फासे पारधी समाज राहतो. या गावात व परिसरात पवन उर्जेचे पंखे उभे राहिल्याने हे गाव जास्त प्रकाशात आले. त्यानंतर गावातील दिनेश पवार व लाखणी पवार या दाम्पत्याने व्हिडिओ बनवून टिकटॉक सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्याला लाखोने लाईक्स् मिळाल्या. त्यात लाख-मोलाची लाईक ठरली ती सिनेअभिनेत्री रविना टंडन यांची. त्यामुळे याची दखल सर्वच वृत्तपत्रांनी व न्यूज चॅनल घेतली आणि सर्वांच्या तोंडी जामदे गावाचे नाव आले.अफलातून नावेहे गाव म्हणजे अफलातून, येथील प्रत्येक गोष्ट अफलातून आहे. टिकटॉकच्या व्हिडिओमुळे हिंदी गाण्यांवर उत्कृष्ट डान्स व अभिनय करणाऱ्या या दांपत्याने सर्वत्र वाहवा मिळवली. त्यात या गावाचे नवीन एक वैशिष्टय म्हणजे गावातील महिला व पुरुष यांची अफलातून नावे आहेत. ही नावे वाचल्यावर क्षणभर विश्वासच बसत नाही, असे नावे कसे काय राहू शकतात, याचेच मोठे आश्चर्य वाटते. यापैकी उदाहरणादाखल काही नावे असे आहेत हे सर्व नावे अधिकृत जामदे गावाच्या मतदारयादीतून घेतली आहेत. त्यात बडा थानेदार, बनारसी बाई, तेजाब, बच्चन, सन्नाटा, शशि कपूर, फोनू बाई, अजय देवगन, आॅफिसर भोसले, सर्विस, राजधानी, पिस्तोल बाई, लवंगी बाई, उंदरी बाई, खन्ना बाई, राष्ट्रपती, नानकटाई, सोनसाखळी, टारझन, गुटका बाई, किरलोस्कर, कुर्बानी बाई, पॉलिस्टर व नमस्ते बाई. नक्कीच ही नावे वाचून कोणीही चक्करमध्ये पडेल. या नावांमध्ये अर्धे बॉलीवूडच्या स्टारची नावे आहेत. यावरून या गावातील नागरिकांवर हिंदी सिनेसृष्टीचा किती प्रभाव आहे, हे दिसून येते.या गावाचे वळणही एखाद्या थरारक हिंदी सिनेमासारखेच आहे या गावात हिरो-हिरोईन आहेत. खलनायकही आहेत. सहअभिनेता व चरित्र अभिनेतेही आहेत. खमंग मसाला म्हणून या गावात पोलिसांचाही नेहमी राबता असतो, असे हे वैशिष्टपूर्ण गाव म्हणजे सर्वांना सुपरिचित झालेले जामदे गावाची ही मनोरंजक कथा आहे.
जामदे गावात अवतरले बॉलीवूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:22 IST