भूषण चिंचोरे
धुळे - सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विविध कंपन्यांकडून ऑफर्सही देत असतात. मात्र काही जण फेस्टिवल ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
ग्राहकाने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवली जाते. ही लिंक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल असे सांगितले जाते. पण अज्ञात वेबसाईटवरुन पाठवण्यात आलेली अशी लिंक डाउनलोड केल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यातील रक्कमच काढली जाते.
सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. ओटीपी पाठवला जातो, नंतर फोन करून ओटीपी मागणे असा प्रकार नेहमीच होतो. तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे असे फोन करून सांगितले जाते. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले जाते. असाच एक प्रकार शिंदखेडा तालुक्यात समोर आला होता. २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून टप्प्याटप्प्याने रक्कम भरायला सांगून तब्ब्ल १६ लाख रुपये उकळण्यात आले होते. तसेच लिंक डाऊनलोड केल्यानंतर फसवणूक केल्याचे प्रकारही घडले आहेत.
अशी होऊ शकते फसवणूक
१ : ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यानंतर अनोळखी संकेतस्थळावरून लिंक येते. लिंक डाऊनलोड केल्यानंतर कॅशबॅक मिळेल असा संदेश त्यासोबत दिलेला असतो. पण अशी लिंक डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली जाते.
२ : तसेच सणासुदीच्या काळात लॉटरी लागल्याचे संदेश पाठवले जातात. सुरुवातीला बँक खात्यात काही रक्कम पाठवली जाते. व लॉटरीची पूर्ण रक्कम मिळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे मागितले जातात, असे संदेश आले तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.
ही घ्या काळजी -
- एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर अनोळखी संकेतस्थळावरुन संदेश येतात त्याकडे दुर्लक्ष करावे.
- कुणी फोन करून ओटीपी मागितला तर देऊ नये. तसेच एटीएमची माहिती देखील कोणाला देऊ नये.
- बँकेतून बोलत असून आपल्या खात्याशी संबंधित माहिती द्या असा फोन आल्यास माहिती देऊ नये.
- कोणतीही बँक ग्राहकाला त्यांच्या खात्याविषयीची माहिती विचारण्यासाठी फोन करत नाही.
ऑनलाईन फसवणूक गुन्हे
जानेवारी - ५
फेब्रुवारी - २
मार्च - ७
एप्रिल - ७
मे - ४
जून - २
जुलै - ५
ऑगस्ट - ४