धुळे : शहरात लालबाग गो सेवाधामने यंदा पर्यावरणपूरक शेण व मातीने तयार केलेल्या आकर्षक गणेशमूर्तींची निर्मिती केली आहे. तसेच नागरिकांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील लालबाग गोशाळेत बेवारस गाईंचे संगोपन केले जाते. या गाईंच्या शेण आणि गोमूत्रापासून गोशाळेत वेगवेगळे उत्पादन घेतली जातात. गोशाळेतर्फे यंदा गायीचे शेण आणि मातीच्या मदतीने आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहे. या गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी घरात एका बादलीत पाणी घेऊन त्यातसुद्धा करता येणार आहे. या मूर्ती पाण्यात काही वेळेत विरगळून जातात. त्यामुळे पाणी दूषित होत नाही. अन्य गणेशमूर्ती विसर्जनानंतरही पाण्यात विरगळत नाही. त्या तशाच पडून असतात. त्यामुळे पाणी तर दूषित होतेच, सोबत आपल्या भावनाही दुखावतात. तसे होऊ नये यासाठी गो सेवाधाममध्ये संगोपन केल्या जात असलेल्या गाईंच्या शेण आणि मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती केली जात आहे. मूर्तीला आकर्षक नॅचरल रंगाचा वापर करून रंगरंगोटीही केली जात आहे. त्यामुळे त्या मूर्ती आकर्षक दिसतात. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. तसेच गो सेवाधामच्या शेण व मातीने तयार केलेल्या मूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन गो सेवाधामचे गोपाल शर्मा यांनी केले आहे. या मूर्तीं आग्रा रोडवरील मे. क्वॉलिटी ड्रग्ज या ठिकाणी उपब्लध असल्याची माहिती गो सेवाधामतर्फे देण्यात आली आहे.