धुळे - येथील शासकिय तंत्रनिकेतनमध्ये ग्रंथालय इमारत बांधकामास मंजूरी देवून त्यासाठी लागणाऱ्या निधीचीही तरतूद करावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे. याबाबतचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे येथे सन १९५४ पासून शासकीय तंत्रनिकेतन कार्यरत आहे. या शैक्षणिक संस्थेची स्वत:ची ३८ एकर जागा आहे. शासकिय तंत्रनिकेतनमध्ये धुळे, नंदुरबार, नशिक, जळगाव येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या संस्थेत ग्रंथालय नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होवून शैक्षणिक नुकसान होत आहे. असे आ. कुणाल पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शासकिय तंत्रनिकेतनमध्ये ग्रंथालय इमारतीची मागणी विद्यार्थी करीत असतात. सदर इमारत बांधकामाचे अंदाजपत्रके व नकाशे प्रशासकिय मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागास पाठविण्यात आले आहेत. इमारत बांधकामासाठी अंदाजित रक्कम ६़७७ कोटी रुपये एवढी आहे. तरी इमारत बांधकामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे.दरम्यान, इमारत बांधकामचा प्रस्ताव तापासून तो तातडीने सादर करण्याच्या सूचना उपसचिव, ग्रंथालय यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली असल्याचेही आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
शासकिय तंत्रनिकेतनमध्ये ग्रंथालय इमारत बांधकामास मान्यता द्या-आ. कुणाल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:58 IST