धुळे - शहरातील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
टप्प्या-टप्प्याने रुग्ण आढळत असल्याने चिंतेत भर पडली आहे. बरेच दिवस जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नव्हता. मात्र मागील १५ दिवसांतच तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र झाली होती. त्यानंतर मे व जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली होती. कोरोनामुक्तीमध्ये जिल्हा सातत्याने राज्यात आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत दोन वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच धुळे कोरोनामुक्त होणारे राज्यातील पहिले शहर ठरले होते. मात्र दोन्हीही वेळी कोरोनामुक्तीचा आनंद अल्पकाळात संपुष्टात आला. सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आल्यानंतर पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने कोरोनामुक्तीचा आनंद अधिक काळ टिकू शकलेला नाही.
रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार -
बुधवारी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोना चाचणी अहवालावर रुग्णालयाचा पत्ता असल्याने, ती व्यक्ती शहरातील आहे की ग्रामीण भागातील याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
पाच दिवसांतच आढळला दुसरा रुग्ण -
मागील पाच दिवसांतच दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी धुळे तालुक्यातील शिरुड येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच ऊसगल्ली येथील रहिवासी असलेल्या बाधित तरुणावरदेखील उपचार सुरु आहेत.