दोंडाईचा : शासनाचा नियमाप्रमाणे दोंडाईचा नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी म्हणजे वाढीव कर आकारणी प्रस्तावित केली होती. त्या वाढीव कर आकारणीवर दोडाईचा शहरातील 3 हजार 300 कर दात्यांनी हरकती घेतल्या असून त्या वाढीव आकारणीवर धुळे नगररचना विभागाचा अधिका?्यांनी दोन दिवस दोंडाईचा नगरपालीकेचा कार्यालयात सुनावणी ठेवली आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक चार वर्षात चतुर्थ वार्षिक आकारणी म्हणजे वाढीव मालमत्ता कर आकारणी केली जाते. येथील नगरपालिकेने सुद्धा चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली होती. वार्षिक कर आकारणी करून तसा प्रस्ताव धुळे नगररचना मूल्यनिर्धारण विभागाकडे पाठविण्यात आला होता. धुळे येथील नगररचना कार्यालय मालमत्तेचे कर योग्य मूल्य ठरविणार होते.परंतु दोंडाईचा सह जिल्ह्यात दुष्काळी जाहीर केला असल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा नगरपालिकेचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल त्यांचा नगरसेवकांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी तातडीची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन वाढीव मालमत्ता कर आकारणी वसुलीस स्थगिती दिली होती. दरम्यान शहरात १० हजार जुन्या व ५०० नव्या मालमत्ता असून त्या पैकी ३ हजार ३०० मालमत्ता धारकांनी वाढीव कर आकारणीविरूद्ध हरकती नोंदविल्या होत्या. त्यांची सुनावणी गुरूवारी सुरू झाल्या. उद्याही सुनावणी होणार आहे. जुन्या मालमत्तांवर ३० टक्के तर नवीन मालमत्तांवर १३ ते १७ रुपये चौरस मीटरप्रमाणे मालमत्ता करात वाढ केली आहे. नवीन मालमत्ता धारकांच्या वाढीव कर आकारणीबाबत २ व ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.दोंडाईचा शहरातील वाढीव मालमत्ता करावर हरकती घेतलेल्या मालमत्ता धारकांची सुनावणी येथील नगरपालिकेचा कार्यालयात सुरू आहे. धुळे नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे अनंत पाटील, मिलिंद अहिरे नागरिकांच्या हरकती ऐकून घेऊन त्याची नोंद करीत आहेत. मालमत्ता धारकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेत आहेत.घराचा आकार, घराचा प्रकार, सुविधा,भाडेकरू यांचा वर कर आकारणी होणार असल्याची माहिती नगररचना विभागाचे अनंत पाटील, मिलिंद अहिरे यांनी सांगितले.या कामी नगरपालिकेचे कर्मचारी मदत करीत आहेत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
वाढीव कर आकारणीविरूद्ध नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:38 IST