धुळे - गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. गॅस सिलिंडरसाठी ९०० पेक्षा अधिक रुपये मोजावे लागत असताना डिलिव्हरी बॉयला आणखी अतिरिक्त पैसे कशासाठी द्यायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गॅस सिलिंडरच्या किमतीत आणखी २५ रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने नागरिक हैराण झाले असून महागाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. गॅस सिलिंडरची सध्या ९०० पेक्षा अधिक रुपये द्यावे लागत आहेत. तसेच सिलिंडर घरपोच देण्यासाठी डिलिव्हरी बॉयला आणखी २० ते २५ रुपये द्यावे लागतात. गॅस सिलिंडरसाठी आधीच जास्त पैसे मोजत असल्याने सिलिंडर मोफत घरपोच करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वितरकांनी डिलिव्हरी बॉयला सूचना केल्या पाहिजेत अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत. तसेच सिलिंडर घरोघरी पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला कंपनी किंवा वितरक पगार देत असते. त्यांना ग्राहकांकडून पैसे घेण्याबाबत सांगितले नसल्याचे शहरातील वितरकांनी सांगितले.
वर्षभरात ३०० रुपयांची वाढ
गॅस सिलिंडरच्या किमतीत मागील वर्षभरात तब्ब्ल ३०० रुपयांची वाढ झाली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका सिलिंडरची किंमत ५९४ रुपये इतकी होती. त्यात तब्बल ३१६ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक गॅस सिलिंडर ९०० ते ९१० रुपयांना मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहकांमध्ये मोठी नाराजी आहे.
वितरक काय म्हणतात?
गॅस सिलिंडर पोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पैसे देण्याबाबत वितरकाकडून सांगितले जात नाही. पण अपार्टमेंटमधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर सिलिंडर पोहचवल्याबद्दल काही ग्राहक खुशीने त्यांना पैसे देतात. आम्ही डिलिव्हरी चार्ज घेत नाही.
- रोहित पाटील, वितरक
आमच्या एजन्सीमार्फत घरोघरी मोफत सिलिंडर पोहचवले जातात. डिलिव्हरी बॉय कोणतेही पैसे आकारत नाही. त्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. शहरात तसेच ग्रामीण भागातही सिलिंडर मोफत पोहचवले जातात. डिलिव्हरी बॉयला पैसे देण्याची आवश्यकता नाही.
मनोज कुवर
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी
प्रत्येक आठवड्यात सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. आता महागाई कमी होण्याची आवश्यकता आहे. आधीच सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. पुन्हा डिलिव्हरी बॉयला पैसे द्यावे लागतात. ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागतो.
- सोनाली वाघ, गृहिणी
गॅस सिलिंडरच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. आता गॅस परवडेनासा झाला आहे. तसेच सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयलादेखील पैसे द्यावे लागतात. गॅस वापरावा किंवा नाही असा प्रश्न पडत आहे. किमान २०० रुपयांनी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या पाहिजे.
- मीना पाटील, गृहिणी