मांडळ येथील रहिवासी असलेले धनराज छगन माळी (४९) हे आर. सी. पटेल माध्यमिक शाळेत शिक्षक होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार घेत असताना २९ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या खिशातून ३०-४० हजारांची रक्कम रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्याची घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. हे फुटेज व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर खिशातून पैसे काढणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र त्याचा तपास अद्यापपर्यंत गुलदस्तात आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम ८ रोजी नियोजित होता.
दरम्यान, त्यांच्या मातोश्री गोकूळबाई छगन चौधरी (६५) यांनादेखील त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना ८ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्यांचादेखील कोरोनाने मृत्यू झाला. धुळ्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या १० दिवसांच्या अंतरात मोठ्या मुलापाठोपाठ आईचादेखील कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांडळ गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन छगन चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.
मुलाच्या दशक्रिया विधीच्याच दिवशी आईचा देखील मृत्यु झाल्यामुळे तो विधी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले़ माजी सरपंच सुनिल भटू माळी यांच्यासह अनेकांनी जीवन चौधरी यांना धीर दिला़