लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प १४ वर्षांनंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे मातीच्या बांधाला तडे जाणे ही तांत्रिक बाब आहे. तरी हे तडे लवकरच बुजविण्यात येणार असून बांधाला कुठलाही धोका नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी दिली.येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माती बांधाला मोठे तडे पडले असून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी तातडीने प्रकल्पाची पाहणी करून मालपूर ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी खुलासा केला आहे. तसेच ग्रामस्थांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. प्रकल्पाची पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर धरण सुरक्षितता संघटनेचे अधीक्षक अभियंता वाय.के. भदाणे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव परिमंडळाचे अधीक्षक अभियंता वंजारी पाहणी करतात व त्यांनी सुचविलेल्या उणिवांवर अंमलबजावणी होते. तरीही तांत्रिक बाब म्हणून हे तडे लवकरच बुजविण्यात येतील, असेही म्हटले आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून त्याची मुर्हतमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेंतर्गत झाली आहे. या धरणाची एकुण ३८५० मीटर लांबी असून धरणाची महत्तम उंची १७.९० मिटर आहे. या प्रकल्पाला अमरावती नदी पात्रात १४८.३० मीटर लांबीचा सांडवा आहे. दोन कालवे असून सन २०१६ पासून सिंचनासाठी हा कालवा हस्तांतरित झाला आहे. मात्र, १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक अपवाद सोडल्यास यावर्षी प्रथमच पुर्ण क्षमतेने प्रकल्प भरला आहे.दरम्यान, माती बांधाला तडे गेल्यामुळे पाणी वाया जाऊन पुन्हा मालपुरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो कि काय, अशी भीती ग्रामस्थांना आहे. तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
१४ वर्षांनंतर प्रकल्प भरल्याने तडे जाणे तांत्रिक बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:34 IST