धुळे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत येणाऱ्या धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात शहरातील नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी १५ फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज वितरीत करण्यात येतील, असे प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे यांनी कळवले आहे.
पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात येतील. त्यासाठी प्रवेश अर्ज दिनांक १५ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत वितरीत करण्यात येतील. प्रवेश अर्ज २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत स्वीकारण्यात येतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याचा अंतिम मुदत ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, शेवगे, सुकापूर, शिरसोले, रोहोड, राईनपाडा, बोपखेल, उमरपाटा, पांगण, वार्सा, चरणमाळ, विहीरगाव तसेच धुळे व शिंदखेडा शासकीय आश्रमशाळा अक्कलकोस, सुलवाडे, म्हळसर शिरपूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, लौकी, कोडीद, उमर्दा, अर्थे, जामन्यापाडा, हिवरखेडा येथून गरजू व पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. तसेच या शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करावी, असेही हाळपे यांनी कळवले आहे.