धुळे : धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गावर फक्त पॅसेंजरच धावते. मात्र गेल्या दीड वर्षापासून पॅसेंजरच बंद असल्याने, या रेल्वे मार्गावरील ८ स्थानके जवळपास ओसच पडलेली आहेत. या स्थानकावरील धूळ कधी झटकणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
धुळे-चाळीसगावदरम्यान पॅसेंजरच्या दोन फेऱ्या होत असतात. सायंकाळी सुटणाऱ्या पॅसेंजरला पुणे व मुंबईसाठी स्वतंत्र बोगी लावण्यात येतात. या मार्गावर आठ स्थानके आहेत.
धुळ्याहून चाळीसगावला जाण्यासाठी पॅसेंजरचे माफक भाडे आहे. त्यामुळे अनेक जण या पॅसेंजरद्वारे प्रवास करतात. मात्र गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २५ मार्च २०२० पासून ही पॅसेंजर बंदच आहे. दुसऱ्यांदा अनलॅाक झाले तरी ही पॅसेंजर अद्याप रुळावर आलेली नाही.
आरक्षणासाठी बुकिंग सुरू
धुळे येथून सुटणारी धुळे-चाळीसगाव पॅसेंजर बंद असली तरी धुळे रेल्वे स्थानकावर इतर एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एकही एक्सप्रेस धावत नाही
धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गावर पॅसेंजरव्यतिरिक्त एकही एक्सप्रेस गाडी धावत नाही. त्यामुळे ही पॅसेंजर सुरू करण्याची नितांत गरज आहे. गोरगरिबांना माफक दरात या पॅसेंजरद्वारे प्रवास करता असतो.
- रामराव पाटील
प्रवासी
रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर दीड वर्षापासून बंद ठेवून त्यांच्याच उत्पन्नावर पाणी सोडलेले आहे. धुळे-चाळीसगाव पॅसेंजर सुरू करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनीच पाठपुरावा करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. फक्त धुळे-चाळीसगाव पॅसेंजरच बंद का? याचे उत्तरही रेल्वेचे अधिकारी देत नाहीत.
- जयेश मिस्त्री
प्रवासी