धुळे : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील ५०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, या महिन्यात दररोज सरासरी १० ते २० रुग्ण आढळले आहेत. दिवाळीच्या आधी २७५, तर दिवाळीनंतर २५३ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ९४० इतकी झाली आहे. ऑक्टोबरअखेर रुग्णसंख्या १३ हजार ४१२ इतकी होती. दिवाळीनंतर राज्यात सर्वत्र रुग्णसंख्येत वाढ होत असताना जिल्ह्यात मात्र या काळात रुग्णांची संख्या वाढली नसल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र दिवाळीच्या काळात संक्रमण वाढल्याने बाधितांची संख्या वाढू शकते, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १५ डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञानी व्यक्त केला आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.६१० रुग्ण झाले बरे - नोव्हेंबर महिन्यात ६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ऑक्टोबरअखेर १२ हजार ७५५ रुग्ण बरे झाले होते. नोव्हेंबरनंतर बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत १३ हजार ३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.पाच रुग्णांचा मृत्यू - नोव्हेंबर महिन्यात ५ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक १५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.. १५ सप्टेबरनंतर मृत्युसंख्येत घट झाली आहे. तसेच बाधितांची संख्याही घटली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.मंगळवारी २५ अहवाल पाॅझिटिव्हधुळे : जिल्ह्यातील आणखी २५ अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ९६५ इतकी झाली आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९४ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात श्रीरंग कॉलनी १, साक्री रोड १ व अभियंता नगर देवपूर येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १७ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १३८ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला. भाडणे साक्री कोविड सेंटर येथील १० पैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महानगरपालिका रॅपिड अँटिजन टेस्टमधील २७७ पैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात महिंदले १, चितोड रोड १, गल्ली क्रमांक तीन १, धुळे १ यांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ६ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला. खासगी प्रयोगशाळेतील ४३ पैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, सप्तशृंगी नगर धुळे १, जय शंकर कॉ. चाळीसगाव रोड १, मनमाड जीन चाळीसगाव रोड १, फॉरेस्ट कॉ. धुळे ३, अमोल नगर देवपूर १, आनंद नगर देवपूर १, बापू भंडारी गल्ली देवपूर १, कुमार नगर साक्री रोड १, तिखी रोड मारुती मंदिराजवळ मोहाडी १, नागरे नगर साक्री १, दहीवेल ता. साक्री १ व मांडळ ता. शिरपूर येथील २ पाॅझिटिव्ह आले.
जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये ४२८ जणांना कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:25 IST