३०० पैकी २५० डोस बाहेरच्या लोकांना, स्थानिक लोक वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:30+5:302021-05-09T04:37:30+5:30

निजामपूर : निजामपूर - जैताणे परिसरासाठी आलेल्या ३०० कोरोना प्रतिबंध लसीचे २५० डोस ऑनलाईनमुळे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या २५० ...

250 out of 300 doses to outsiders, locals to the wind | ३०० पैकी २५० डोस बाहेरच्या लोकांना, स्थानिक लोक वाऱ्यावर

३०० पैकी २५० डोस बाहेरच्या लोकांना, स्थानिक लोक वाऱ्यावर

Next

निजामपूर : निजामपूर - जैताणे परिसरासाठी आलेल्या ३०० कोरोना प्रतिबंध लसीचे २५० डोस ऑनलाईनमुळे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या २५० लोकांनी पटकावले व या परिसरातील केवळ ५० लोकांनाच लस मिळू शकली. अनेक स्थानिक लोक रखडले असल्याचा चीड आणणारा प्रकार येथे घडला आहे.

बाहेरचे तुपाशी आणि स्थानिक उपाशी असा हा प्रकार घडला आहे. जैताणे प्राथ. आरोग्य केंद्रात दुपारी बैठक झाली. साक्री पं. स. गट विकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, साक्री तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. के. तडवी, डॉ. अन्सारी, पी. एन. सोनार यांना स्थानिक नागरिकांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ मिळण्याबाबतचे संयुक्त निवेदन देताना निजामपूर व जैताणे सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव व अशोक मुजगे यांनी दिले. यावेळी डाॅ. महेश ठाकरे, महेश राणे, गणेश न्याहळदे, आदी उपस्थित होते.

जिल्हा लसीकरण अधिकरी यांना जैताणे ग्रामपंचायतीने कोविड-१९ लसीकरणाची ऑनलाईन नोंद पद्धत बंद करावी व ऑफलाईन नोंद सुरू व्हावी असे पत्र बैठकीत दिले. जैताणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ लसीकरण सुरू असून, जैताणे गावात अशिक्षित, आदिवासी, दलित, भटके विमुक्त, शेतकरी व शेतमजूर यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने गावातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने नोंद करता येत नाही. किंवा बहुसंख्य ग्रामस्थांकडे स्मार्ट फोन नाहीत. ऑनलाईन सेशन कधी सुरू होते याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळत नाही. ७ ते ८ मे रोजी ऑनलाईन सेशन ३०० डोससाठी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत एक तास सुरू राहिले. बाहेरील जिल्ह्यातील २५० लोकांनी व गावातील फक्त ५० लोकांचेच रजिस्टेशन झाले. गावातील नागरिकांवर ते अन्यायकारक ठरले. याचा गैरफायदा जिल्ह्याबाहेरील नागरिक घेत असून, गावातील नागरिक लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत.

त्याकरिता कोविड-१९ लसीकरणाची ऑनलाईन नोंद बंद करण्यात यावी, अन्यथा आम्ही बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांचे लसीकरण होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामपालिका जैताणे यांनी पत्रातून दिला आहे. निजामपूर जैताणे परिसरातील नागरिकांचे "ऑफलाईन" पद्धतीने रजिस्ट्रेशन व लसीकरण करण्यात यावे. लोकसंख्येनुसार लसीचा जास्तीत जास्त साठा जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया- संपूर्ण राज्यभरात कलम १४४ लागू असून, इतक्या कडक निर्बंधांमध्ये अकोला, नगर, उल्हासनगर, वाशिम, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतीलच नव्हे तर परराज्यातून, सुरत, बलसाड, नवसारी यासारख्या शहरांमधून लोक येईपर्यंत येतातच कसे? हादेखील खरा प्रश्न आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून जैताने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामपालिकेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक कडक उपाययोजना अंमलबजावणीत आणून नियंत्रण आणले आणि बाहेरून आलेल्या अशा लोकांमुळे पुन्हा एकदा गावात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

प्रशासनाने ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धत तत्काळ बंद करावी, अन्यथा उद्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या बाहेरील व्यक्तींचे लसीकरण होऊ देणार नाही

-अशोक मुजगे,

माजी पंचायत समिती सदस्य साक्री

Web Title: 250 out of 300 doses to outsiders, locals to the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.