लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : हरियाणा येथून बनावट देशी दारूचे ८०० खोके भरून नाशिक कॅन्टींन येथे माल देण्यासाठी जात असल्याची खोटी पावती तयार करून ट्रक मार्गस्थ झाला होता़ दरम्यान, शिरपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी फाट्याजवळ ट्रकला पकडण्यात येवून गाडीसह सुमारे ४८ लाखाची बनावट देशी दारुचा मद्यसाठा जप्त करण्यात आला़ याप्रकरणी तिघांना जेरबंद करण्यात आले आहे़११ रोजी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी फाट्यानजिक बनावट देशी दारूचा ट्रक पकडला़ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर, हवालदार ललित पाटील, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, योगेश कोळी़ बापूजी पाटील, तुकाराम गवळी, हारूण शेख यांच्या पथकाने सापळा रचून शहादाकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक युपी-२१-बीएन-३४७३ यास थांबवून चौकशी केली़ संबंधित चालकाने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिलीत़ पोलिस खाक्याचा धाक दाखविताच त्यांनी गाडीत खोके असल्याचे सांगितले़गाडीत हिट प्रिमियम व्हिक्सी कंपनीची बनावट देशी दारूचे ८०० खोके मिळून आलेत़ प्रत्येकी ४८ नग १८० मिलीच्या क्वॉर्टर असा एकूण ३८ लाख ४० हजार रूपये व गाडीची किंमत १० लाख असा एकूण ४८ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़वाहनात रामा रोडवेज प्रा़ लि़ दिल्ली ब्रँच आॅफिस जळगांव नावाचे ट्रान्सपोर्टचे नावे असलेली खोटी पावती तयार करून तिचेवर गर्व्हमेंट आॅफ इंडिया मिनिस्ट्री आॅफ डिफेन्स कॅन्टींन स्टोअर्स डिपार्टमेंट बेस डेपो अंबाला राज्य हरियाणा येथून नाशिक कॅन्टींनला माल भरण्याचे खोटे नमुद करून सदर वाहनात प्रत्यक्षात विदेशी बनावट दारूचे खोके मिळून आलेत़ सदर दारू मानवी जिवीतास पिण्यास अपायकारक असून ती पिण्यामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो याची त्यांना जाणीव असतांना तो बाजारात विक्री करण्यासाठी वाहनात भरून कब्जात बाळगून तिची वाहतुक करण्यासाठी भारतीय सेनेचे नावाचा वापर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतांना रंगेहात मिळून आला़याबाबत गाडी चालक मोहमंद शरीफ अली मोहमंद (२२) रा़जमालगड ता़ पुन्हाना जि़मेवात (हरियाणा), सहचालक इस्माईल शहाबुद्दीन खान (१८) रा़सुबासिर्डी ता़ताबडू जि़ जूहू मेवात व विनोद पुंडलिक जाधव (२६) रा़राणी मोहिदा ता़पानसेमल जि़बडवानी (मध्यप्रदेश) असे तिघांना जेरबंद करण्यात आले़पो़ कॉ़ स्वप्नील बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघे आरोपी विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२८, ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ३४ सह मु़प्रोक़ाक़़ ६५ अ, ६५ ई, ८० (१), (२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलिस तपास सुरू आहे़
वाहनासह ४८ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:57 IST