बोरकुंड, रतनपुरा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी १४ रोजी बोरकुंड येथे संपन्न झाला. या समारंभाप्रसंगी भुसे दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. बोरकुंड व रतनपुरा जि. प.गटात विविध शासकीय योजनांतून, अवघ्या चौदा महिन्याच्या अल्प कालावधीत १ हजार ९०९ लाखांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
बोरकुंड येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे धुळे नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे होते. तर विकासकामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह संपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, डाॅ. तुळशीराम गावित, महेश मिस्तरी, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, किरण जोंधळे, उपजिल्हाप्रमुख आधार हाके, संघटक विलास चौधरी, देवराम माळी, तालुकाप्रमुख धनराज पाटील, चंद्रकांत म्हस्के, गुलाब माळी, परशुराम देवरे, साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी जि.प. सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे, माजी जि. प. सदस्य देविदास माळी, माजी जि.प.सदस्य प्रभाकर पाटील, पं.स.सदस्य देवेंद्र माळी, पं.स.सदस्य बाबाजी देसले आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यात ड्रिप एरिगेशन, पीकविमा आदींबाबत समस्या जाणून घेतल्या. बोरी काठावरील वसलेल्या गावांचा पोखरा योजनेत आमच्या गावांचा समावेश करावा असा आग्रह यावेळी शेतकऱ्यांनी धरला. यावर मालेगाव तालुक्यातील गावांबरोबर बोरकुंड परिसरातील गावांचा या योजनेत समावेश केला जाईल अशी शाश्वती मंत्री भुसे यांनी दिली. तसेच मांडळ धरणाचा कॅनाॅल दुरुस्ती, गिरणा डावा कालवा दुरुस्ती, २५-१५ योजनेतून गावांसाठी पायाभूत सुविधा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या, यास मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, तुम्हाला ज्या अडीअडचणी असतील त्या सोडविल्या जातील, तसेच त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.
यावेळी बबनराव थोरात, हिलाल माळी, महेश मिस्तरी, तुळशीराम गावित आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळसाहेब भदाणे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, चौदा महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीत बोरकुंड, रतनपुरासह नाणे, चांदे, होरपाडे, सिताणे, दोंदवाड, नंदाळे, तरळाडे, विंचूर या गावांचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात गावाला जोडणारे व गावांतर्गत रस्ते मजबुतीकरण, काँक्रिटीकरण वा डांबरीकरण करणे, स्वच्छतागृह व शाळा खोल्या बांधणे, भूमिगत गटारी करणे, नदी व नाल्यावर विविध प्रकारचे बंधारे, तळफरशी वा संरक्षक भिंत बांधणे, विविध गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसवणे, खुल्या जागेवर व्यायामशाळा साहित्य, शेतीसाठी नवीन रोहित्र बसवणे आदी कामांसाठी तब्बल १९ कोटी निधी मंजूर करण्यात यश आले आहे, भविष्यातही ही विकासगंगा अशीच राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर भदाणे यांनी तर आभारप्रदर्शन नीरज बागुल यांनी केले.