धुळे : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या (भू-विकास बँक) कर्जदार, थकबाकीदार सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत १४ सभासदांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा भू-विकास बँकेचे अवसायक डॉ. सोपान शिंदे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
राज्य शासनाने २० ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेच्या (भू-विकास बँक) कर्जदार/थकबाकीदार सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत अर्ज स्वीकृतीची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. या योजनेंतर्गत होणारी तडजोडीची रक्कम ३१ मार्चपर्यंत भरल्यावरच या योजनेचा लाभ सभासदांना मिळणार आहे. या योजनेमुळे धुळे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेच्या (भू-विकास बँक) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ६९८ सभासदांना लाभ होणार आहे. आतापर्यंत १४ सभासदांनी १० लाख ५३ हजार ३४१ रुपये भरून खाते बंद केले आहे. तसेच १४ सभासदांनी १७ लाख ४० हजार ८४९ रुपयांची सवलत घेतली आहे. उर्वरित सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठीचे अर्ज बँकेचे येथील मुख्य कार्यालय, गल्ली क्रमांक दोन, नवग्रही, महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीसमोर, धुळे येथे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सार्वजनिक सुटीचे दिवसाखेरीज कार्यालयीन वेळेत पाच रुपये शुल्क भरुन उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व थकबाकीदार, कर्जदार सभासदांनी किंवा त्यांच्या वारसांनी त्यांचे अर्ज पूर्ण भरून २८ फेब्रुवारीपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि त्यामुळे कर्जदार या योजनेपासून वंचित राहल्यास बँक जबाबदार राहणार नाही. अधिक माहितीसाठी बँकेचे व्यवस्थापक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी केले आहे.