धुळे : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजीटल झालेल्या आहेत. मात्र या डिजीटल शाळेच्या जवळपास ११२ वर्ग खोल्या धोकेदायक अवस्थेत आहे. त्यासाठी तब्बल दहा कोटी ३० लाख ४० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा या धोकेदायक खोल्यांमध्येच विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेने या शाळा खोल्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी पालकांनी केलेली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या शाळा अनेक वर्षांपूर्वीच्या असल्याने, यातील काही वर्गखोल्या नादुरूस्त झालेल्या आहेत.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा असून, त्यात पहिली ते चौथीचे जवळपास ९० हजार ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती दयनीय होती. या शाळांमध्ये मिळणारे शिक्षण खाजगी शाळांचे तोलामोलाचे नव्हते. त्यामुळे पालकवर्गही आपल्या पाल्याला गावात शाळा असूनही शहराच्या शाळांमध्ये दाखल करायचे.मात्र आता ती स्थिती राहिलेली नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच्यासर्व जिल्हा परिषद शाळा या डिजीटल झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढलेला आहे.जि.प.शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट व्हावा यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम सुरू केले. मात्र शाळा दुरूस्तीसाठी मिळत असलेल्या अपुऱ्या निधीमुळे वर्गखोल्या दुरूस्तीवरही मर्यादा येऊ लागलेल्या आहेत.जि.प.च्या काही ठिकाणी शाळांच्या वर्गखोल्या सुस्थितीत असल्या, तरी काही ठिकाणी शाळा खोल्या या धोकादायक झालेल्या आहेत. अशा धोकादायक खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करावे लागत आहे.खर्च प्रस्तावितएक वर्ग खोली दुरूस्त करण्यसाठी ९ लाख २० हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ११२ वर्ग खोल्या दुरूस्तीसाठी किमान १० कोटी ३० लाख ४० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत नुकताच महाराष्टÑ राज्य शिक्षण परिषदेकडे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. त्यात वर्ग खोल्या दुरूस्तीसाठी हा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे.तीन कोटी मंजूरदरम्यान जिल्ह्यातील ४०२ शाळांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे जवळपास ३ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. मात्र अद्याप त्याचे वितरण सुरू झालेले नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी व चारही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची बैठक झाल्यानंतरच या निधीचे वितरण होऊ शकते अशी माहिती देण्यात आली.जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणात्मक बदल झालेला आहे. मात्र भौतिक सुविधांची वानवा जाणवते. त्यातच काही शाळांच्या वर्गखोल्या खराब,धोकेदायक, जीर्ण झालेल्या असल्याने, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच ज्ञानार्जन करावे लागते आहे.त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाने विशेषत: प्राथमिक शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन वर्गखोल्या दुरूस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यापूर्वी या वर्ग खोल्यांची दुरूस्ती होणे आता जवळपास अशक्य दिसत आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस विद्यार्थ्यांना अशा धोकेदायक खोल्यांमध्येच बसावे लागेल अशी चिन्हे आहेत. मात्र या धोकेदायक खोल्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
११२ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:56 IST