धुळे : जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२० व २०२१ मध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईपोटी १० कोटी ९३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात सलग चार दिवस पावसाची रिपरिप व जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतदेखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर कापूस, ज्वारी, कांदा, बाजरी, हरभरा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. जिल्हा काँग्रेसच्या वतीने पंचनामे करून तत्काळ मदत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले होते. या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १० कोटी ९३ लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईपोटी दहा कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST