धुळे : कोरोनाच्या आपत्कालिन परिस्थितीत जिवाचा धोका पत्करून काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रसंगी कोरोनाची लागण झाल्यानंतर बेड उपलब्ध होत नाही. पर्यायाने त्यांना उपचारासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात जावे लागत आहे. यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत, त्या टाळण्यासाठी व कोरोना योद्ध्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्ससाठी १० टक्के बेड आरक्षित करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांना कोरोनासंदर्भातील काम लावताना वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश न देता, तोंडी आदेशाने सूचना देऊन कोरोनाचे कर्तव्य पार पाडायला लावत आहेत. दुर्दैवाने कोविडच कर्तव्य बजावताना, एखाद्या शिक्षकाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला, तर शासनाने जाहीर केलेले पन्नास लाख रुपयांचे कोविड सुरक्षा विमा कवचचा लाभ कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही, त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे लेखी आदेश ग्राह्य मानले जातात. म्हणूनच प्राथमिक शिक्षकांना कोविड संदर्भातील कामे देताना सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानेच देण्यात यावीत, अशा मागणी मेलद्वारे करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, जिल्हा प्रमुख संघटक ऋषिकेश कापडे, कोषाध्यक्ष संजय जिरे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, विभागीय सचिव रवींद्र देवरे, महिला अध्यक्ष दीपा मोरे, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे, कोषाध्यक्ष रंजना राठोर, संघटक मीरा परोडवाड, उपाध्यक्ष संगीता ठाकरे, उपाध्यक्ष कैलाश सोनवणे, दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, मधुकर देवरे, कमलेश चव्हाण, शरद कानडे, विलास थोरात, आदींनी कळविले आहे.