तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक याज्ञवल्क्य धार्मिक उत्सवास रविवारपासून भवानीशंकर मंडपात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
श्री शुक्ल यजुर्वेद संहिता पारायणाची शतकोत्तर परंपरा तुळजापुरातील ब्राह्मवृंदांनी अव्याहत चालू ठेवली आहे. व्यासपूजन व गुरुपौर्णिमेनिमित्त आषाढ शुद्ध ९ ते पौर्णिमेपर्यंत हा धार्मिक सोहळा चालतो. विश्वकल्याण जनकल्याणार्थ हा उत्सव पारंपरिकपणे प्रतिवर्षी साजरा केला जातो. या धार्मिक उत्सवाचे यंदाचे १७२ वे वर्ष आहे. विविध ठिकाणांहून या सेवेला वैदिक ब्राह्मण येतात. यावर्षी कोरोना संसर्गामुळे बाहेरील ब्राह्मणवृंद कमी प्रमाणात आले असून, यामध्ये नाशिकहून वेदमूर्ती पार्थ प्रभाकर गोडशे हे सेवेत रुजू आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, गणेश अंबुलगे-नंदीबुवा, श्रीकृष्ण अंबुलगे-नंदीबुवा, गजानन लसणे, किरण पाठक, विजय पाठक, गिरीश देवळालकर, प्रतीक प्रयाग हे रुद्रपाठ, संहितापाठ ही वेद पारायण सेवा करीत आहेत. या उत्सवाची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली जाते. हा उत्सव कोरोना प्रतिबंध नियम पाळून साजरा केला जात आहे.