उस्मानाबाद : आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कीटकनाशकांचा वापर करताना काही अडचणी येऊ नयेत, तसेच त्याचे दुष्परिणाम व आवश्यक ते उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी सजग राहावे जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधा, दुर्घटना टळू शकतील, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आयोजित डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दिले.
कृषी आयुक्तालय, कृषी विभाग पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासून दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता उपचार व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा सोमवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर बोलत होते. कार्यशाळेचे प्रशिक्षक तथा केंद्र शासनाचे माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो यांनी जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांना कीटकनाशक विषबाधा झाल्यानंतर जिल्ह्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना व कोविडची लक्षणे यातील फरक कसे ओळखावे, विषबाधा यांच्या प्रकरणात डॉक्टरांनी करावयाच्या विविध उपचार पद्धती, औषधांची उपलब्धता याची शास्त्रयुक्त माहिती दिली. अनेकदा कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करून रसायने तयार केली जातात. अशा वेळी, दुष्परिणाम घडल्यास कुठला अँटिडोस द्यायचा याविषयी अद्ययावत माहिती असावी. तसेच, कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. असे कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मुख्य गुणनियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे सुनील बोरकर यांनी संबोधित केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जे. चिमणशेट्ये, क्रॉप लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, बायरचे सुशील देसाई, शिवार फाउंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते. कार्यशाळेत यवतमाळ व जळगाव जिल्ह्यातूनही ११०० पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सेन यांनी प्रस्तावना तर संयोजक शिवार फाउंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी आभार मानले.
कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी दोन लाख बळी : डॉ. देवव्रत कानुंगो
कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी दोन लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कीडनाशकांची सहज उपलब्धता, दोन रसायनांचे मिश्रण, फवारणीच्या घटना, फवारणीचा लांब कालावधी, संरक्षण किटशिवाय फवारणी, सदोष फवारणी यंत्राचा वापर व योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे विषबाधेने बळी जाण्यामागे असतात. कीटकनाशकांचे तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घ्यावी.