येणेगूर : महामार्ग न ओलांडता अंडरपास पुलाचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी सोलापूर टोल प्लाझाच्या वतीने येथे पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून हे काम अर्धवट स्थितीत रखडल्याचे चित्र आहे.
पुणे-हैद्राबाद जोडणाऱ्या या मार्ग क्रमांक ९ चे चौपदरीकरणात ६५ क्रमांकाने नामकरण झाले. सध्या राष्ट्रीय महामार्ग निगमच्या सोलापूर कार्यालयाकडून सोलापूर-सस्तापूर-बंगला या कर्नाटक सीमेपर्यंतची देखरेख केली जाते. या महामार्गाच्या चौपदरी करणातील १०१ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूच्या जमिनीचे २०११ पासून अधिग्रहण करण्यात आले. याला आता तब्बल १० वर्षे उलटली तरी काम अद्यापही पूर्ण झाले नाही.
गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाण पूल व अंडरपास पुलाचे नियोजन करण्यात आले. परंतु, एकही ऊड्डाणपूल व अंडर पास पुलाचे काम देखील अद्याप पूर्ण नाही. या महामार्गाच्या कामाच्या नंतर सुरू झालेले तुळजापूर-लातूर रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले. परंतु, ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्यापही प्रगतिपथावरच आहे.
विशेष म्हणजे येणेगूर गावच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये दक्षिणेकडील रस्त्याचा वापर होत असून, उत्तरेकडील सर्व्हिस रोडवर नागरिकांनी, व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जुन्या खड्ड्याच्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. शिवाय, अंडरपास पुलाच्या केवळ दक्षिणेकडील भागाचे बांधकाम झाले असून, तर उत्तरेकडील कामाचा अद्याप श्रीगणेशाही झाला नाही. वरिष्ठ कार्यालयाने या अंडरपास पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.