उस्मानाबाद : टेंभुर्णी-लातूर महामार्गावरील उस्मानाबाद जिल्हा हद्दीतील पळसप पाटी ते येडशी दरम्यानचे रस्त्याचे अर्धवट अवस्थेत आहे. याचा फटका वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांना बसत आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांना यांची भेट घेऊन कामाला गती देण्याची मागणी केली.
टेंभूर्णी-लातूर महामार्गावरील उस्मानाबाद जिल्हा हद्दीतील पळसप पाटी ते येडशी दरम्यानचे रस्त्याचे काम हॉटमिक्सिंगद्वारे ८ महिन्यांपूर्वी करण्यात आले. परंतु, त्या मार्गावरील साईडपट्ट्या, सेंटरलाईन मार्किंग व अन्य कामे करण्यात आलेली नाहीत. अर्धवट असलेली ही कामे पूर्ण करावीत. साेबतच आठ महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, आदी मागण्यांवरून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची त्यांनी मागणी केली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदाेलन करू, असा इशाराही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
लुटमारीच्या घटना वाढल्या...
दुधगाव ते येडशी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब बनला आहे. जागाेजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर लुटमारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. परिणामी वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपराेक्त प्रकार लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने अर्धवट रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज व्यक्त हाेत आहे.