कळंब : शहरातून जाणाऱ्या खामगाव -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने चालले असल्याने शहरातील ट्रॅफिक जामचा अनुभव दररोज वाहनचालकांना येतो आहे. शहरातील मुख्य भागातील जवळपास १०० फुटाच्या रुंदीच्या रस्त्याचे अर्धेच काम झाल्याने हे काम पूर्ण कधी होणार? याबाबत सस्पेन्स कायम आहे.
खामगाव -पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग कळंब शहरातून जात आहे. उपजिल्हा रुग्णालय ते पंचायत समिती सभापती निवासस्थानापर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. एका बाजूला १५ मीटर व दुसऱ्या बाजूला १५ मीटर रुंद, मध्यभागी दुभाजक, दोन्हीही बाजूला नाल्या, फुटपाथ व रस्त्याच्या कडेला लोखंडी जाळ्या बसवल्या जाणार असल्याची माहिती आहे.
या मार्गावर इतर शहरातील रस्त्याच्या मुख्य भागात असेच रस्ते संबंधित कंत्राटदार कंपनीने बनविले आहेत. त्यामुळे रस्त्याचा तोच पॅटर्न कळंब येथेही अंमलात आणला जाणार आहे, असे कंत्राटदार कंपनीचे म्हणणे आहे. सध्या शहरातील दोन्हीही बाजूला अर्धवट रस्ते करून ठेवले आहेत. १५ मीटर पैकी ७-८ मीटरचा रस्ता एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला तेवढाच रस्ता केला आहे. उर्वरित रस्त्याचे, त्याच्या बाजूच्या नालीचे काम कधी होणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. पोलीस निवासस्थान तसेच उपजिल्हा रुग्णालयाजवळील या मार्गावरील पुलाचे काम रखडत चालले आहे.
चौकट -
व्यापाऱ्यांची धाकधूक कायम
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. या मार्गावरील बहुतांश जागा बाजार समिती व न.प.च्या मालकीच्या आहेत. त्यामुळे जागा ताब्यात घ्यावी लागली तरी महामार्ग प्रशासनाला काही अडचण येणार नाही. मात्र, रस्त्याच्या जवळपास १०० फुटाच्या रुंदीमध्ये येणाऱ्या दुकानांना हटवावे लागणार आहे. त्यांना अद्याप प्रशासनाने काही कळविले नाही, कंत्राटदार कंपनीने काही सांगितले नाही. अचानक सामान काढून घ्या म्हटले तर जायचे कोठे, असा प्रश्न या भागातील व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने किती जागा रस्त्यामध्ये जाणार आहे, याची कल्पना द्यावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.