उस्मानाबाद : श्रावण महिन्यात जिल्ह्यातील सर्वच शिवालये भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे मंदिरे बंद असून, ती उघडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंदिरे नाही उघडल्यास भाविकांचा हिरमोड होणार आहे, शिवाय या तीर्थक्षेत्र ठिकाणी होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीवरही पाणी सोडावे लागणार आहे.
जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र रामलिंग, श्रीक्षेत्र वडगाव (सि), उमरगा तालुक्यातील अचलबेट, उमरगा शहरातील महादेव मंदिर, तसेच तुळजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव आदी ठिकाणी श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात प्रसाद, बेल, फुले आदीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तालुक्यातील रामलिंग येथे तर संपूर्ण महिनाभर भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळते. त्यामुळे येथे खेळणी, सौंदर्य प्रसाधने आदी दुकानेही लावली जातात. व्यावसायिक, तसेच येडशी ग्रामपंचायतीलाही या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते.
मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद असून, श्रावण महिन्यातही ती उघडतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे मंदिरे नाही उघडल्यास भाविकांचा तर हिरमोड होणारच, शिवाय या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढालही बुडणार आहे.
९ पासून श्रावण
९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. २९ दिवसांच्या या महिन्यात चार श्रावणी सोमवार असून, या प्रत्येक सोमवारी भाविकांच्या गर्दीने शिवालय गजबजून जातात, परंतु राज्य शासनाने अजून तरी मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मंदिरात सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.
व्यावसायिक म्हणतात ....
रामलिंग येथील मंदिर परिसरात माझे खेळणी विकण्याचे दुकान आहे, परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान मंदिर बंद आहे. त्यामुळे व्यवसायही ठप्प आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत असून, दुकानातील साहित्य तसेच पडून आहे.
- हरिश्चंद्र शिदे, खेळणी दुकानदार येडशी.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून दरवर्षी श्रावण महिन्यात रामलिंग मंदिर परिसरात माझे प्रासादिक भांडारचे दुकान असते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरली नाही, यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. तरी शासनाने मंदिर उघडून व्यापाऱ्यांचे नुकसान थांबवावे.
- सिद्धेश्वर पवार, प्रासादिक भांडार दुकानदार, येडशी.