उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर आता पुन्हा २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पुराचे पाणी, विजांपासून काळजी घेण्याचे आवाहन शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
जोराचा पाऊस सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे किंवा बाहेर असल्यास पुराच्या पाण्यात जाण्याचा धोका पत्करू नये, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. याशिवाय, जलसाठे पाहण्यासाठी, पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. स्थलांतरित होण्याची वेळ आल्यास औषधी, रोख सोबत असू द्यावी. पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या क्षेत्रात पशुधन बांधून ठेवू नये. विजांचा धोका असल्याने पशुधन झाडाखाली, विद्युत खांबाजवळ बांधू नये. सोयाबीनची कापणी झालेली असल्यास गंजी शक्यतो नदी, ओढ्यांच्या पात्रालगत लावू नयेत. ती सुरक्षित ठिकाणी लावून व्यवस्थित झाकून घ्यावी. पाऊस सुरू असताना विद्युत तारा, जुन्या इमारतींजवळ आश्रय घेऊ नये. ते कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी नागरिकांना केल्या आहेत.