उस्मानाबाद : केंद्र सरकारने इम्पिरीकल डेटा देण्यास नकार दिल्यानंतर ओबीसीसाठी आंदोलन करणारी भाजपा आता कोठे आहे, केंद्र सरकारच्या विरोधात ते आंदोलन करणार का? असा सवाल उस्मानाबाद पालिकेतील सेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
ओबीसी समाजासाठी आपणच लढतोय, असा भास निर्माण करणाऱ्या भाजपचा मुखवटा आता समोर आला आहे. राज्य शासनाने राज्य मागासवर्गीय आयोग लवकर नेमला नसल्याची टीका करण्यात आली होती. असे असेल तर केंद्रानेही इम्पिरिकल डेटातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी एक तज्ज्ञ गट नियुक्त केला होता. पाच वर्षांत अद्यापही त्या गटाची साधी एक बैठक झालेली नाही. या बाबीवर कोण बोलणार? आतातर हा डेटा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आंदोलक उघडे पडले आहेत. ओबीसी समाजाबद्दल खोटा पुळका दाखवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण ओबीसी समाज सशक्त व सक्षम झाला आहे. खऱ्या-खोट्यांची चांगली जाण समाजाला आहे. ओबीसी समाजाबाबत खरेच सहानुभूती असेल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता केंद्राच्या विरोधात बोलून, आंदोलन करुन दाखवावे, असे आव्हानही गुरव यांनी दिले.