तुळजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली असतानाही तुळजापुरात व्यापारी, शेतकऱ्यांकडून मागील दोन-तीन आठवड्यांपासून प्रत्येक मंगळवारी बाजार भरविला जात होता. अखेर नगर परिषद प्रशासनाने ३१ ऑगस्ट रोजी सकाळीच बाजारस्थळी भेट देत आलेल्या बाजारकरू, व्यापाऱ्यांना परत पाठवून बाजार बंद केला.
मागील आठवड्यातील मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजार भरल्याने व शेजारील जिल्ह्यातून देखील भाजीविक्रेते, व्यापारी आल्याने बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठवडी बाजारात विक्रीसाठी कोणी येऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते; परंतु याकडे दुर्लक्ष करीत ३१ ऑगस्ट रोजी अनेक शेतकरी भाजीपाला घेऊन सकाळी आठवडी बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित न. प. कर्मचाऱ्यांनी आलेल्या सर्वांना आठवडी बाजारात बसण्यास मनाई करून परत पाठवले. त्यामुळे मंगळवारचा आठवडी बाजार भरलाच नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने आठवडी बाजार बंद केल्याचे सांगण्यात आले.