तामलवाडी : गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तुळजापूर तालुक्यातील सांगवी-मांळुब्रा ब्रहत तलावातील पाणी सांडव्याद्वारे वाहू लागल्याने सांगवी गावानजीकचा पूल गुरुवारी रात्री १० वाजता पाण्याखाली गेला. परिणामी १२ तास गावाचा संपर्क तुटला होता. शुक्रवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर गावकरी पुलावरील पाण्यातून वाट शोधत ये-जा करीत होते.
गुरुवारी सायकांळी साडेसहा वाजता तामलवाडी भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. दोन तासांच्या पावसाने तलावाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला. यामुळे सांगवी-पांगरदरवाडी गावास जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने रात्री १० वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक थांबली. पुलावर मध्यरात्री ५ फूट पाणी असल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर येता आले नाही. गेल्या ३० वर्षांपासून पुलाचा प्रश्न रेंगाळला असून, सलग तीन वर्षांपासून पावसाळ्यात पूल पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प होत आहे.
दरम्यान, १० तासाच्या अवधीनंतर पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गावकऱ्यांना गुडगाभर पाण्यातून वाट शोधत एकमेकांना मदतीचा हात देत गावाबाहेर पडता आले. दरम्यान, गुरुवार रात्रीच्या पावसाने या भागातील नाले, ओंढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.
चौकट
दोन्ही बाजूला पाण्याचा वेढा
सांगवी गावाच्या उशाशी एक लघू पाट बंधारे तर दुसरा बृहत तलाव आहे. हे दोन्ही तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे गावानजीकच्या दोन्ही पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली. गावाला शुक्रवारी पाण्याचा वेढा होता. गतवर्षी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांनी गंजेवाडी रस्त्यावर पूल बांधण्यासाठी पाहणी केली. मात्र, वर्षभरात यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना पुलाचा प्रश्न भेडसावत आहे
पुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल
सध्या राष्ट्रीय महामार्ग ते पांगरदरवाडी या पाच किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हाती घेण्यात आले आहे. सांगवी गावानजीकच्या पुलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरीनंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे शाखा अभियंता नेताजी दंडनाईक यांनी दिली.