कलदेव निंबाळा : कायमस्वरुपी योजनेची मागणी
बलसूर : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा गावात कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही. त्यामुळे ग्रामस्थांना वर्षातील नऊ-दहा महिने घागरभर पाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कलदेव निंबाळा हे कलदेव साडेतीन हजारांच्या वर लोकसंख्या असलेले भूकंपग्रस्त गाव असून, केवळ दोन कूपनलिकांद्वारे येथील ग्रामस्थांची तहान भागविली जाते. या कूपनलिका देखील दमदार पावसानंतर दोन-तीन महिने चालतात. त्यामुळे यानंतरच्या कालावधीत ग्रामस्थांना शेतशिवारात भटकंती करून पाण्याचा शोध घ्यावा लागतो. सध्या ऐन पावसाळ्यात ही गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, याबाबत सरपंच सुनीता पावशेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ग्रामपंचायतीकडून जलजीवन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यास मंजुरीने गाव टँकर मुक्त करावे, यासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे. आता ग्रामस्थांचा संयम सुटत चालला असून, हा प्रश्न तत्काळ मार्गी नाही लागल्यास मंत्रालयासमोर गावकऱ्यांसह उपोषण शिवाय पर्याय नाही.
कोट........
गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्याने सतत भटकंती करून पाणी मिळवावे लागत आहे. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तत्काळ राबवून गावचा पाणी प्रश्न मिटवावा .
- कमळाबाई पांचाळ, ग्रामस्थ