पाथरूड : पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात उस्मानाबाद पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनाही सहभागी झाली आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील पशुरुग्णसेवा पूर्णत: ठप्प झाल्याचे चित्र आहे.
विविध मागण्यांबाबत वेळोवेळी रीतसर निवेदन देऊनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने संघटनेने १५ जूनपासून लसीकरणासह सर्व ऑनलाइन मासिक, तसेच वार्षिक अहवाल बंद करण्याचे आंदोलन सुरू केले होते. यात संवर्गातील सदस्य कोणत्याही आढावा बैठकीस हजर राहिले नाहीत. यानंतर २५ जूनपासून राज्यातील सर्व विधानसभा, विधान परिषद सदस्यांना निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप या प्रश्नांबाबत कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने १६ जुलैपासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. परिणामी, ग्रामीण भागातील पशुसेवा ठप्प झाली असून, पशुपालकांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, संघटनेने आंदोलनाचे सविस्तर निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर अध्यक्ष डाॅ. जहाँगीर शेख, उपाध्यक्ष डाॅ. व्ही.आर. मारकड, डाॅ. एन.के. गुप्ता, राज्य कार्यकारिणी सदस्य, डाॅ. सदानंद टकले, डाॅ. एस.एस. ताकभाते, डाॅ. पी.जी. नाथबुवा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.