कळंब : रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनिसांच्या ३३ जागांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात गुणानुक्रमे ‘टॉपर’ असलेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या इयत्ता सातवी गुणपत्रिकेला आता पडताळणीच्या परीक्षेत ‘उत्तीर्ण’ व्हावे लागणार आहे.
तालुक्यातील २४९ अंगणवाडीमधून शून्य ते सहा वयोगटांतील बालकांच्या शिक्षण व आरोग्यासह स्तनदा व गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशा या महत्त्वाच्या अंगणवाडीमधील ३३ मदतनीस, पाच सेविकांची पदे रिक्त होती. यासाठी ९ जुलैपासून भरती प्रक्रिया सुरू केली असता, १९ जुलै या अंतिम तिथीपर्यंत ३९ जागेसाठी तब्बल चारशेवर अर्ज आले होते. गुणानुक्रमे होणाऱ्या या भरती प्रक्रियेत प्राप्त अर्जांची छाननी करून, ४ ऑगस्ट रोजी याची यादी डकविण्यात आली होती. दरम्यान, प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी प्रक्रिया पार पाडत १३ ऑगस्टपर्यंत या संबंधी आक्षेप मागविले होते. या दरम्यान, रहिवास, गुणांच्या नोंदीसंदर्भात काही गावांतून हरकती नोंदविण्यात आल्या होत्या.
चौकट...
© सातवी गुणपत्रिकेची पडताळणी...
दरम्यान, मदतनीस पदासाठी सातवी तर सेविकांसाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता होती. यापैकी दहावीचा निकाल बोर्डाच्या ‘कस्टडी’त असल्याने शंकाकुशंकेचा प्रश्न नव्हता. मात्र, सातवीची परीक्षा अन् निकाल शाळेच्या अखत्यारितील विषय असल्याने खबरदारी घेत, सीडीपीओ ऑफिसने गुणानुक्रमे प्रथमस्थानी असलेल्या ३३ मदतनिसांच्या सातवी गुणपत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे. यानुसार, संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. यामुळे आत्ता निवड यादीतील ‘टॉपर’ उमेदवारांनी सादर केलेल्या सातवीच्या गुणपत्रिकेला पडताळणीच्या परीक्षेत ‘उत्तीर्ण’ व्हावे लागणार आहे
© बीईओंचा अहवाल, पण मागविला...
दोन चाचण्या व दोन सत्र परीक्षा होत असलेल्या सातवीसाठी आरटीई लागू झाल्यानंतर ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ लागू झाले. यातून ‘आकारीक आणि संकलीत’ मूल्यांकन केेले जाऊ लागले. या स्थितीत आता सीडीपीओंनी उमेदवारांनी सादर केलेली गुणपत्रिका आपणच निर्गमित केली आहे का? यात तत्कालीन निर्देशानुसार गुणांकन केले आहे का? याविषयी मुख्याध्यापकांना विचारणा तर केली आहे, शिवाय यासंबंधी गटशिक्षण अधिकाऱ्याकडून गुणदान पद्धत, गुणपत्रिका नमुना यासंबंधी स्वयंस्पष्ट अहवाल मागविला असल्याचे सांगण्यात येते.