परंडा : मागील २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर परंडा तालुक्यात वरूणराजाने शनिवारी रात्री जाेरदार बॅटींग केली. पाचही मंडळात अतिवृष्टीची नाेंद झाली. या पावसाच्या पाण्यामुळे खासापुरी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले. तर चांदणी प्रकल्प ‘फुल्ल’ झाल्याने २४ स्वयंचलित वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी लाेटूनही परंडा तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांची झाेळी रितीच हाेती. तर पाण्याअभावी खरीप हंगामातील खासकरून साेयाबीन पीक धाेक्यात आले हाेते. कारण उडीद, मूग या पिकांना पावसाने खंड दिल्याने अगाेदार फटका बसला हाेता. दरम्यान, शनिवारी रात्री परंडा तालुक्यात धाे-धाे पाऊस काेसळला. परंडा मंडळात १०७, आसू ८४, जवळा ९४, अनाळा ८५ तर साेनारी मंडळामध्ये तब्बल ९१ मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाच्या पाण्यामुळे खासापुरी प्रकल्प ओव्हर फ्लाे झाला आहे. तर चांदणी प्रकल्पही तुडुंब भरल्याने स्वयंचलित वक्र गेट उघडण्यात आले. त्यामुळे या दाेन्ही प्रकल्पांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पावसामुळे साेयाबीन पिकाला फायदा झाला असला तरी अन्य पिकांना फटका बसल्याचे शेतकरी सांगताहेत.
चाैकट...
पूल पाण्याखाली...
खासापुरी तसेच चांदणी या दाेन्ही प्रकल्पांतून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने रविवारी सकाळी परंडा-भूम या रस्त्यावरील वाकडी येथील पूल पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास चार तास ठप्प झाली हाेती.