तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्थांच्या आरोग्य केंद्रासमोर सकाळपासूनच रांगा लागत होत्या. या केंद्रामध्ये एकूण २६१८ ग्रामस्थांना लस देण्यात आली तर यापैकी ४८५ ग्रामस्थांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला; परंतु, केंद्रामध्ये लस उपलब्ध न झाल्याने इतर ग्रामस्थांचे लसीकरण रखडले आहे.
आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक सोमवार, बुधवार, शनिवार या दिवशी लसीकरण केले जाते. त्यामुळे लसीकरणासाठी तेरखेडा व इतर गावांतील ग्रामस्थ सकाळपासून रांगा लावून बसतात. लस आली नाही, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर ग्रामस्थ आले तसे परत जातात. त्यामुळे मात्र ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरण सुरू होईल, असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर, डाॅक्टर सांगतात. तेरखेडा प्रा. आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणास कधी सुरुवात हाेणार, अशी विचारणा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी महिंद्रकर यांना फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.