तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते काटी या मार्गावर करण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम वाळूऐवजी दगडाच्या डस्टमध्ये केले जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
गेल्या मे महिन्यापासून सुरतगांव ते काटी या १५ किमी मार्गाच्या कामाला प्रारंभ झाला. साइडपट्ट्याचे खोदकाम करून, त्यात भरण्यात येणारा मुरुम मातीमिश्रीत लालसर असल्याची तक्रार ग्रामस्थ चंद्रोदन माळी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र, त्या मुरमाचा अहवाल प्रयोगशाळेने चांगल्या प्रतिचा दाखविला व तसे प्रमाणपत्र ठेकेदाराला दिले, तसेच पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारे सिमेंट पाइप आयएसआय प्रमाणित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेकेदाराने पाइप बदलले. सध्या पूल बांधकामासाठी वाळूचा वापर न करता, दगडी पावडरचा वापर होत आहे. याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.