उमरगा तालुक्यातील मुरूममधील स्वातंत्र्यसैनिक भाई भगवानसिंग (दादा) यांच्या काही आठवणी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात आहेत. भगवानदादांचा जन्म १४ ऑगस्ट १९२२ रोजी मुरूम येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण सोलापूर येथे चालू केले. शालेय जीवनापासूनच अन्यायाची व जुलमी राजवटीची चीड त्यांच्या मनात होती. यातूनच थोर सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या सहवासाने अग्नी भडकत गेला आणि संग्रामाच्या मशाली पेटू लागल्या. त्यांनी सोलापूरला एका जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा खात्मा वयाच्या १८ व्या वर्षी केला. त्यामुळे काॅलेजमधून त्यांचे निलंबन झाले. यानंतर त्यांनी भूमिगत राहून कारवाया केल्या. या काळात अनेक देशभक्तांचा सहवास व प्रेरणा मिळाली. यातून देशभरातील क्रांतिकारकांच्या चळवळीने व बलिदानाने देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु, मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीत यातना भोगत होता. याच काळात भाई भगवानसिंग भूमिगत चळवळ संपवून पुन्हा सक्रिय झाले. संग्रामाची आखणी होऊ लागली. १ ऑक्टोबर १९४७ रोजी हा संघर्ष सुरू झाला. गुलबर्गा जिल्ह्यातील सरसंबा (ता. आळंद) येथील करोडगिरी नाक्याची धूळधाण केली. केसरजवळगा येथे कॅम्प संघटन केले. जामगा येथे नाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून करोडगिरी व जामगा येथील सर्व रेकाॅर्ड जाळून टाकले. यावेळी तब्बल सहा तास फायरिंग चालली. त्यात त्यांनी अलीशरे नावाच्या सैनिकाला यमसदनास पाठवले. त्यामुळे बाकीचे सैनिक शस्त्रे टाकून पळाले. हीच शस्त्रे व दारूगोळा वागदरी व घोळसगाव येथील कॅम्पप्रमुखांना देण्यात आला. यातूनच सशस्त्र क्रांती सुरू झाली.
जानेवारी १९४८ ला लेव्ही प्रतिबंध व अनेक केंद्रांवर हल्ला करून लूटमार केली. मार्च १९४८ मध्ये अनेक रझाकार केंद्रे, निजामी पोलीस पार्टी, जुलमी रोहिले व पठाण यांच्यावर सशस्त्र हल्ले करून त्यांनी जेरीस आणले. अनेक पोलीस ठाण्यांवर हल्ले करून रसद जमा केली. अनेक तरुणांना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तलवार, रायफल, पिस्तूल व बाॅम्बगोळ्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम स्वत: दादा करीत होते. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी धैर्याने झुंज दिली. जनतेचा क्षोभ पाहून १७ सप्टेंबर १९५८ रोजी मराठवाडा मुक्त झाला. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व भारत सरकारतर्फे भगवानसिंग गहेरवार यांचा यथोचित सन्मान झाला. तत्कालीन पंतप्रधानांच्या वतीने ताम्रपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला.