उस्मानाबाद -पुणे जिल्ह्यातून चाेरीस गेलेल्या दुचाकींसह हदगाव येथील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. ही कारवाई येरमाळा-बीड महामार्गालगत असलेल्या एका बंद रसायन निर्मिती कारखान्याच्या पाठीमागे १४ सप्टेंबरच्या पहाटे करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १४ सप्टेंबरच्या पहाटे येरमाळा येथे गस्तीवर हाेते. याचवेळी एक तरुण येरमाळा येथील माेटारसायकल संशयितरित्या बाळगून आहे, अशी गुप्त माहिती पथकाच मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने येरमाळा-बीड महामार्गालगतच्या एका बंद अवस्थेतील रसायन निर्मिती कारखान्याच्या पाठीमागे छापा टाकला. यावेळी येथून याेगेश अरुण कसबे (रा. हदगाव, ता. केज) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यात जवळपास सहा दुचाकी आढळून आल्या. दुचाकींची मालकी, ताबा याबाबत चाैकशी केली असता, समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर पथकाने वाहनांचा सांगाडा व इंजिन क्रमांकावरून शाेध घेतला असता, सहापैकी चार दुचाकी पुणे जिल्ह्यातून चाेरी गेल्याचे निष्पन्न झाले तसेच उर्वरित दाेन दुचाकीही चाेरीच्याच असाव्यात, असा पाेलिसांचा संशय आहे. उर्वरित तपासासाठी आराेपीस येरमाळा पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि पवाार, पाेहेकाॅ कवडे, काझी, शेळके, पाेना घुगे, पाेकाॅ सर्जे, जाधवर, काेळी यांच्या पथकाने केली.