उस्मानाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना तुळजापूर तालुक्यातील नंदगाव व तामलवाडी येथील तलाठ्यांनी नुकसानीच्या यादीमधील मर्यादेपेक्षा जास्तीचे अनुदान वाटप केलेल्याचे उघडकीस आल्याने उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी त्या दोघा तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपिटीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यानंतर गारपीटग्रस्तांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र या अनुदानासाठी पात्र एकूण क्षेत्राची मर्यादा २ हेक्टर निश्चित करण्यात आली होती. असे असतानाही तामलवाडी तलाठी आर. पी. कुंभार यांनी तामलवाडी येथील एका खातेदारास २ हेक्टरपेक्षा जास्तीचे अनुदान नमूद करुन शासनाचे नुकसान केले. याशिवाय गाव नमुने व अद्यावत न ठेवणे, प्रत्यक्ष पाहणी न करता नुकसानीचे पंचनामे केल्याचे उघडकीस आले होते.याशिवाय तालुक्यातील लोहगाव सज्जाचे तलाठी एस. एस. कुलकर्णी यांनीही सय्यद समदानी जहागीरदार, सय्यद हमदानी समदानी जहागीरदार, सय्यज मजीक मय्यद समदानी जहागीरदार, खैरुनिया सय्यद समदानी जहागीरदार व सय्यद मजहिद सय्यद समदानी जहागीरदार यांना जास्तीचे क्षेत्र वाटप केल्याचा अहवाल तुळजापूर तहसीलदारांनी उस्मानाबाद उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. यावरून उपविभागीय अधिकारी बोधवड यांनी या दोन्ही तलाठ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ अन्वये सेवेतून निलंबित केले आहे. तसेच या दोन्ही तलाठ्यांना निलंबन काळातील मुख्यालय तहसील कार्यालय ठेवण्यात आले आहे. तुळजापूर तहसीलदारांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, असे या निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निलंबन कालावधीत खाजगी नोकरी व अथवा व्यवसाय करु नये. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास गैरवर्तनुकीबाबत दोषी ठरवून निर्वाहभत्ता गमावण्यास पात्र ठरविण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
दोन तलाठी निलंबित
By admin | Updated: September 26, 2014 01:20 IST