उस्मानाबाद : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने एसटी प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करु नये, याकरिता एसटी महामंडळातर्फे २२ सप्टेंबरपासून प्रवास तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
ही तपासणी उस्मानाबाद विभागातील सर्वच मार्गांवर होणार आहे. याकरिता सहा फिरती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जीपद्वारे सहा आगारांतून ही पथके विविध मार्गावर बसेसची तपासणी करीत आहेत. शिवाय, आठही तालुक्यातील स्थानकांवर ८ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आगारातील पर्यवेक्षक बसस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करीत आहेत. एखाद्या प्रवाशाने विनातिकीट प्रवास केल्यास त्याच्याकडून दुप्पट दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विनातिकीट प्रवासावर आळा बसणार आहे. ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. मागील दोन दिवसात विनातिकीट प्रवास करणारा एकही प्रवासी आढळून आला नाही.
कोट...
एसटी महामंडळाकडून २२ सप्टेंबरपासून प्रवास तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दोन दिवसात विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून आलेले नाहीत. ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे. विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळून आल्यास तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये दंड केला जाणार आहे.
अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद